निसर्गोपचार पध्दती
निसर्गोपचार
आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराची काळजी आता निसर्गोपचाराच्या माध्यमातून घेता येते. जुन्यातला जुना आजार बरा करण्यासाठी नॅचरोपॅथी म्हणजेच निसर्गोपचार पध्दतीचा वापर केला जातो. निसर्गोपचार पद्धतीत आजाराच्या लक्षणापेक्षा सरळ आजाराचा शोध घेतला जाऊन त्यावर उपचार केला जातो.
ही पध्दती आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला मिळालेले एक वरदान आहे. आपण पाहिजे तेथे ह्या उपचार पध्दतीचा वापर करू शकतो. इतर उपचार पध्दतीत रूग्णावर विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. मात्र निसर्गोपचार पध्दतीत साईड इफेक्ट होण्याची मुळीच भीती नसते.
निसर्गौपचार पध्दती ही सर्वश्रेष्ट विनाऔषध उपचार पध्दती असून आता सगळ्याना या उपचार पध्दतीची महत्त्व पटले आहे. फार प्राचीन उपचार पध्दती असल्याने याबरोबर पातंजली योगसूत्रांचाही वापर केला जात असतो. आजाराने खचलेल्या रूग्णाचा आत्मविश्वास उच्चावण्यासाठीही निसर्गोचार पध्दतीचा उपयोग केला जातो.
संपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक भाग आहे. आपले शरीरही याच पंचतत्त्वांपासून बनलेले असून या पाचही तत्त्वांचा समतोल आपणास सुदृढ व चैतन्यमय ठेवतो. जेव्हा यातील एखादे तत्त्व बिघडते, म्हणजेच हा समतोल ढळतो, तेव्हा आपल्या शरीरात आजार किंवा व्याधीचा शिरकाव होतो.
आपल्या शरीरातील अस्थी, मांस, त्वचा, नाडी व रोग हे पृथ्वीतत्त्वाच्या अधीन आहेत. शुक्र, रक्त, लाळ, मूत्र, स्वेद हे जलतत्त्वाच्या अधीन आहेत तर क्षुधा, तृष्णा, आळस, निद्रा व मैथुन हे अग्नितत्त्वाच्या अधीन असतात. वायुतत्त्वाच्या अधीन चलन-वलन, आकुंचन, प्रसरण व निरोधन असते तसेच काम, क्रोध, लोभ, मोह व भय हे आकाशतत्त्वाच्या अधीन असतात. ही पंचतत्त्वे आपल्या शरीरातील सूक्ष्म नाड्यांमधून सतत प्रवाहित होत असतात. योग्य आहार, विहार, विचार आणि व्यायाम माणसाला चिरकाल निरोगी व आनंदी ठेवतात.
मानवी रोगांच्या चिकित्सेकरिता कोणतेही औषध किंवा शल्यचिकित्सा न वापरता फक्त नैसर्गिक साधनांचा म्हणजे सूर्यप्रकाश, उष्णता, शीतता, ध्वनी, पाणी, फळे, इत्यादींचाच उपयोग ज्या चिकित्सेत करतात तिला ‘निसर्गोपचार’ म्हणतात.
भारतामध्ये प्राचीन हिंदू संस्कृतीने निसर्गोपचार हे जगाला दिलेले एक वरदानच आहे, असे म्हणावयास हरकत नाही. प्लेटो, ॲरिस्टॉटल आणि हिपॉक्राटीझ यांच्या अगोदर कित्येक शतकांपूर्वी भारतीय ऋषींनी व योग्यांनी निसर्गोपचाराची महती विशद केली होती. लंघन, आहार, जलचिकित्सा, मर्दन, योगासने [⟶ योग चिकित्सा] इत्यादींचा ते शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करण्याकरिता उपयोग करीत. यांपैकी काही तत्त्वांचे महत्त्व पटण्याकरिता त्यांनी धर्मामध्येच समाविष्ट केली होती व ही तत्त्वे आदरयुक्त आस्थेने अमलात आणली जावीत, हा त्यामागील उद्देश होता.
महात्मा गांधी निसर्गोपचार या अल्पमोली व बहुगुणी चिकित्सा पद्धतीचे मोठे पुरस्कर्ते होते. त्यांनी या विषयावरील अनेक पुस्तकांचे अध्ययन केले व स्वतःवर अनेक प्रयोग करून, या विषयाचे आपले सिद्धांत ‘आरोग्याचा मार्गदर्शक’ या आपल्या पुस्तकात मांडले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत व आत्मशुद्धीकरिता त्यांनी अनेक उपोषणे केली होती व त्यांवरून त्यांना लंघन शरीरप्रकृतीला अतिशय हितकर असते, याची जाणीव झाली होती. त्यांच्या अनुभवातून या पद्धतीला पोषक असे त्यांनी मांडलेले काही सिद्धांत पुढे दिले आहेत : ‘आपली जीभ ज्याला ताब्यात ठेवता येते त्याला बाकीची इंद्रिये ताब्यात ठेवणे मोठेसे कठीण नाही’.‘कंदमुळे व फळे हाच निसर्गदत्त मानवी आहार आहे’, ‘सर्व प्रकारच्या व्यायामात चालण्याच्या व्यायामाला अग्रस्थान दिले पाहिजे’.
तत्वे
निसर्गोपचार पद्धती व्यावहारिक ज्ञानाच्या पायावर उभारलेली आहे. विचार, श्वसन, अन्नग्रहण, पान, पोशाख, काम, विश्रांती, सामाजिक आणि लैगिंक जीवन यांपैकी कोणत्याही बाबतीत निसर्ग नियमांचे उल्लंघन केल्यास रोग लक्षणे उद्भवतात. निसर्ग नियमांचा भंग मग तो जाणूनबुजून किंवा नकळत झाल्यासही रोग उद्भवतात. सर्वच रोग निसर्गाने योजिलेल्या शुद्धीचे प्रकार असतात. आधुनिक निसर्गोपचार पद्धतीचे आधारस्तंभ लिंडलार म्हणतात, ‘प्रत्येक तीव्र रोग म्हणजे निसर्गाने स्वच्छता करण्याचा व शरीर पूर्वीच्या सुस्थितीत नेण्याच्या प्रयत्नाचा परिणाम असतो’. म्हणून बाह्य लक्षणांचे स्वरूप व गांभीर्य निरनिराळी असली, तरीही या पद्धतीत ‘सर्व रोग एकच’ या तत्त्वाचा अंगिकार केला गेलेला आहे. सर्व रोग मग ते साधे पडसे असो किंवा त्वचा उत्स्फोट (पुरळ) असो, अतिसार असो किंवा निरनिराळे ज्वर असोत, निसर्गाचा शरीरातून सूक्ष्मजंतू, व्हायरस वा विषे काढून टाकण्याचाच प्रयत्न असतो. मानवी शरीराची प्राकृतिक स्थिती निरोगीच असणार व जीवशक्तीचा प्रयत्न ती तशी टिकविण्याकडेच असणार. बाह्य घटकद्रव्ये (आहारादि) आणि परिस्थिती अनुकूल अशी निर्माण झाल्याबरोबर जीवशक्तीचा पुनःस्वास्थ्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होतो व परिणामी रोग नाश होऊन प्रकृतिस्थापन होते, यालाच निरामयतेचा ‘नैसर्गिक मार्ग’ म्हणतात.
निसर्गोपचार पद्धतीच्या आधुनिक चिकित्सकाला पुढील मार्गाचा अवलंब करून रोगचिकित्सा करता येते :
(१) निसर्गतत्त्वाकडे परत वळणे : आहार, पान, श्वसन, स्नान, पोषाख, काम, विश्रांती, विचार, नैतिक जीवन, लैंगिक व सामाजिक जीवन शिस्तबद्ध करणे.
(२) रासायनिक उपाय : शास्त्रीय दृष्टिकोनातून आहारविद्या तत्त्वानुसार अन्नाची निवड, जैवरासायनिक उपाय, साधे वनस्पती अर्क, पोषण, रासायनिक द्रव्ये इत्यादींचा उपयोग करणे.
(३) मूलघटक संबंधित उपाय : जल, हवा, प्रकाश, माती, सूर्यस्नान यांचा जिच्यात उपचारार्थ उपयोग करतात अशी उपाययोजना.
(४) यांत्रिक उपाय : रोगनाशक कसरती, मर्दन, घर्षण, कंपन इत्यादींचा वापर करणे.
(५) मानसिक व आध्यात्मिक उपाय : शास्त्रोक्त मानसिक विश्रांती, प्राकृतिक सूचना, पोषक विचार व प्रार्थना यांचा समावेश यामध्ये होतो.
काही विशेष उपचार
निसर्गोपचारातील काही विशेष उपचारांची माहिती येथे दिली आहे.
लंघन :
सर्व प्रकारचे अन्नसेवन बंद करून फक्त पाणी व हवा यांवरच जीवन जगण्याला लंघन करणे म्हणतात. लंघन व उपासमार यांमधील मोठा फरक लक्षात ठेवावयास हवा. लंघन हितकारक, शुद्धिकारक, पुनरुज्जीवक असते; तर उपासमार हानिकारक, घातक व हळूहळू आत्मघात ओढवणारी असते. लंघन जिथे संपते तिथे उपासमार सुरू होते. एकसारखे खात राहणे जीवनावश्यक नाही, हे सामन माशाच्या जीवनावरून स्पष्ट दिसून येते. हा मासा फक्त खाऱ्या पाण्यातच भक्षण करतो. प्रजोत्पादनाकरिता नर व मादी गोड्या पाण्याकडे जातात. त्या वेळी त्यांना प्रवाहाविरुद्ध लांबचा खडतर प्रवास करावा लागतो. या प्रवासास निघण्यापूर्वी धष्टपुष्ट असणारे मासे प्रवासाहून परत खाऱ्या पाण्यात येतात तेव्हा किरकोळ बनतात; परंतु या नैसर्गिक लंघनाने त्यांच्या स्नायूंच्या क्रियाशीलतेवर दुष्परिणाम होत नाही. क्षुधा (प्राकृतिक आहारेच्छा) व अन्न वासना (सवयीने निर्माण झालेली आहार व पानाची इच्छा) यांत भेद आहे. क्षुधा किंवा खरी भूक ही केव्हा खावे याची निदर्शक असते. लंघनाचा काळ निश्चित ठरविणे शक्य नाही. तो रुग्णाची स्थिती व रोग यांवर अवलंबून असतो. संधिवात, आमांश व्रण, यकृत विकार, दमा इ. हट्टी रोग, त्याचप्रमाणे गोवर, कपाळदुखी, अपचन, पोटदुखी, डांग्या खोकल्यासारखे मुलांना होणारे रोग, लंघन अल्पावधीत बरे करते असा या चिकित्सकांचा दावा आहे. निरोगी माणसांनी सुद्धा आठपंधरा दिवसांनी एकदोन दिवसांचे लंघन करणे हितावह समजले जाते. बहुतेक रुग्णांत लंघनसमाप्तीच्या सुमारास क्षुधा प्रज्वलित होते, श्वास दुर्गंधी नाहीशी होते, तोंडाची अरुची नाहीशी होते, प्रसन्न वाटू लागते व जिभेवरील कीटण नाहीसे होते. ही लक्षणे स्थूलमानाने लंघन पुरेसे झाल्याचे निदर्शकही असतात. लंघनाने बरा होऊ शकणार नाही असा रोगच नाही, असे म्हटले तरी चालेल. रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत लंघन हितकर असतेच; परंतु काही रोगांमध्ये ते कोणत्याही अवस्थेत रोगनिवारक अथवा नियामकही असू शकते. बऱ्याच रोगांमध्ये लंघन चिकित्सा प्रभावी असली, तरी लंघन हे एक दुधारी शस्त्र आहे. कारण परिस्थितीनुसार ते जेवढे हितकारक तेवढेच अहितकारकही ठरू शकते. अविचाराने किंवा अज्ञानाने वापरल्यास त्यापासून अपाय संभवत असल्यामुळे योग्य निसर्गोपचार तज्ञाच्या देखरेखीखालीच हा उपाय करून घ्यावा. लंघनापूर्वी आणि लंघनानंतर विशिष्ट आहार क्रमाने घ्यावा लागतो व त्याकरिता चिकित्सकास आहारविज्ञानाची माहिती असणे आवश्यक असते. तसे न केल्यास आंत्रमार्ग आणि सबंध शरीरालाच कायमची इजा होण्याची शक्यता असते. लंघन काळात मलविसर्जनाकरिता बस्ती घेणे हितकारक व अनिवार्य असते [⟶ लंघन].
बस्ती : (एनिमा)
आंत्रमार्गात गुदद्वारामार्गे द्रव पदार्थ अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) अथवा गुरुत्त्वाकर्षणाने सरकविण्यास बस्ती म्हणतात. आंत्रमार्गाचा खालचा भाग विशेषेकरून गुदाशय आणि त्यालगतच्या बृहदांत्राचा (मोठ्या आतड्याचा) भाग, जेथे मल साचतो, तो धुण्याचा त्यामागे उद्देश असतो. लंघन सुरू करण्यापूर्वी बस्ती घेण्याने लंघनाचा शुद्धिकारक लाभ वृद्धिंगत होतो. लंघन चालू असताना निदान दोनतीन वेळा बस्ती घेणे उत्तम, परंतु तो आजिबात न घेणे अयोग्य असते. बस्ती हे शरीरशुद्धीचे एक यांत्रिक साधन असल्यामुळे व निसर्गोपचार तज्ञांना त्याचे महत्त्व पटल्यामुळे ते त्याचा सर्रास वापर करतात. औषधी रेचकामुळे जी हानीहोण्याचा संभव असतो तो या उपचारात आजिबात नसतो. बस्तीकरिता पाण्यासारखाच द्रव बहुधा वापरला जात असल्यामुळे तो जलोपचाराचाच एक भाग आहे, असे म्हणावयास हरकत नसावी. बस्ती अर्धा लिटर पाण्यात सबंध कागदी लिंबाचा रस किंवा १ ते १•५ ग्रॅ. सैंधव घालून त्या पाण्याचा घ्यावा. बस्ती कसा घ्यावा याविषयी मतभिन्नता आहे. उजव्या कुशीवर झोपून बस्तिपात्राने बस्ती घेणे उत्तम [⟶ बस्ति].
आहार :
निसर्गोपचारात आहाराला महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक पाश्चात्य चिकित्सापद्धतीत जसा ‘औषधी निघंटु’ हा एक महत्त्वाचा भाग असतो. तसाच या पद्धतीत ‘आहार द्रव्य निघंटु’ हा महत्त्वाचा भाग असतो. आपण ज्या प्रकारची आहारद्रव्ये सेवन करतो त्यावर आपली शारीरिक, मानसिक आणि नैतिक अवस्था अवलंबून असते. अन्नप्रकारावर संपूर्ण जीवनच अवलंबून असते. केवळ डोळ्यांना किंवा जिभेला रुचते ते खाण्यापेक्षा जे शरीराची निरोगी अवस्था टिकविण्यास मदत करील तेच खाणे हितकारक असते. जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान), वय, शरीराचे वजन, नेहमीचे काम इत्यादींवर आहार अवलंबून असतो. म्हणजेच तो बहुतांशी वैयक्तिक असतो. रुची, इच्छा, ग्रहणशक्ती, प्रवृत्ती, वैयक्तिक स्वभावविशेष इ. भिन्न असतात. यामुळे सर्वांना मानवेल असा एकच ठराविक आहार सांगणे कठीण आहे. म्हणून येथे काही स्वयंसिद्ध तत्त्वांचा उल्लेख फक्त केला आहे :
(१) आदर्श आहार संतुलित असावा.
(२) आहार जीवन, वाढ, स्वास्थ्य व प्रजोत्पादनास पूरक असावा. दूध, लोणी, चीज, तृणधान्ये, फळे व भाज्या हे पदार्थ असलेला आहार शरीराची सर्व गरज पुरवू शकतो.
(३) जरूरीप्रमाणे अन्नाचे दोन किंवा तीन वेळा सेवन करावे.
(४) दोन जेवणांच्या दरम्यान दररोज चार ग्लास पाणी प्यावे. काही तज्ञांच्या मताप्रमाणे खरी तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये. तसेच जेवताना पाणी पिणेही चुकीचे आहे. पाण्याच्या घोटाबरोबर अन्न गिळत राहणे हानिकारक असते. जेवणानंतर तीन तासांनी आणि जेवणापूर्वी एक तास अगोदर पाणी पिणे योग्य असते.
(५) आहारद्रव्यांचे दोन वर्ग पाडता येतात : (अ) अम्लोत्पादक आणि (आ) क्षार (अल्कली) उत्पादक. दूध, सर्व फळे व भाज्या दुसऱ्या वर्गात मोडतात आणि मांस, अंडी व तृणधान्ये पहिल्या वर्गात मोडतात. सर्वसाधारणपणे क्षार-उत्पादक आहारद्रव्यांचे प्रमाण अधिक असणे हितावह असते.
(६) अन्न शिजविण्याचे काही नियम : (अ) अती शिजवू नये. (आ) मंदाग्नीवर हळूहळू शिजू द्यावे. (इ) अति रुचकर बनवू नये व भाज्या शिजवताना सोडा वापरू नये. (ई) शक्य तेवढे कमी पाणी वापरावे. (ए) भाज्या शिजवलेले पाणी फेकून देऊ नये. (ऐ) तळू नये. (ओ) फळे व भाज्या बारीक चिरून वापराव्यात. (औ) ॲल्युमिनियमाची भांडी शिजवण्याकरिता वापरू नयेत. (अं) जेवावयास बसल्यानंतर आहारविषयक विचार डोक्यात घोळू न देता, व्यवसाय धंदा इत्यादींसंबंधीचे विचार मनात न आणता, कोणत्याही आवडत्या विषयाकडे लक्ष जाऊ देऊन खाण्याचा आनंद उपभोगावा [⟶ आहार व आहारशास्त्र].
व्यायाम :
व्यायामाचा आणि शरीरस्वास्थ्याचा घनिष्ठ संबंध सर्वमान्य आहे. निसर्गोपचार चिकित्सकाचा बलोपासनेसाठी व्यायाम करण्याशी संबंध नसून रुधिराभिसरणास मदत होईल, अहितकारक शरीरस्थिती सुधारेल, स्वनिर्मित विषे बाहेर टाकण्यास मदत होईल व कोणताही आजार दूर करण्यास मदत होईल, अशा व्यायाम प्रकारांची त्याला निवड करावी लागते. मर्दन : शरीरातील ऊतकांची नियंत्रित दाबाने हाताने घडवून आणलेली योजनाबद्ध हालचाल ज्या कृतीद्वारे करतात, तिला मर्दन म्हणतात. चोळणे, मालिश, चंपी, अभ्यंग आणि संवहन थोड्याफार फरकाने याच कृतीची नावे आहेत. मूळ फ्रेंच शब्द ‘मॅसर’ पासून इंग्रजी भाषेत ‘मसाज’ शब्द रूढ झाला असावा व त्याचा अर्थ ‘चोळणे किंवा रगडणे’ असा होतो. मर्दन या उपचाराची महती फार पुरातन काळापासून ज्ञात असावी. निसर्गोपचार चिकित्सकाशिवाय इतर पद्धतीचे चिकित्सकही मर्दनाचे महत्त्व मानतात [⟶ मर्दन चिकित्सा].
जलोपचार : निसर्गोपचारातील या चिकित्सेकरिता पाण्याचा त्याच्या घन, द्रव व बाष्प या तिन्हीपैकी कोणत्याही अवस्थेत उपयोग केला जातो. सर्व रोगहारक पदार्थांपैकी जल हा सर्वप्रथम वापरलेला पदार्थ असावा. हिपॉक्राटीझ यांना पाण्याच्या गुणधर्मांचे चांगले ज्ञान असावे. ज्वर, व्रण, रक्तस्त्राव आणि इतर काही रोगांवर ते पाण्याचा उपयोग करीत. ईजिप्शियन, हिब्रू, ग्रीक, पर्शियन आण भारतीय प्राचीन लोक जलोपचारांचा उपयोग करीत. रोमन काळातील स्नानगृहे प्रसिद्ध असून इ. स. चौथ्या शतकात खुद्द रोममध्येच त्यांची संख्या १,००० होती. त्यांची बांधणी तुर्की स्नानगृहासारखीच असे व त्यांत निरनिराळ्या तापमानांना ठेवलेल्या खोल्या असत. उत्तर भारतात अजूनही हमामाचे अथवा ‘बादशाही स्नानगृहाचे’ मोगलकालीन अवशेष बघावयास मिळतात. आधुनिक तुर्की स्नानगृहे हमामांचीच सुधारून वाढविलेली आवृत्ती असून यूरोपात लोकप्रिय आहेत. आजच्या जलोपचार चिकित्सेच्या लोकप्रियतेचे श्रेय व्हिन्सेंट प्रीसनिट्झ यांना द्यावे लागते व त्यांना जलोपचाराचे जनक मानतात. न्यूयॉर्क येथील बॉक् तसेच मिशिगन राज्यातील जॉन एच्. केलॉग यांनी जलोपचारांना पद्धतशीर स्वरूप देऊन त्यापासून मिळणारे फायदे इतरांना दाखवून दिले. खनिजयुक्त जल चिकित्सेकरिता पोटातून देतात वा बाह्योपचारांसाठीही वापरतात [⟶ खनिज जल]. पाण्याचे काही विशिष्ट गुणधर्म असे आहेत की, ज्यांमुळे ते उपचाराचे एक उत्तम साधन बनते. पाण्यामध्ये उष्णता शोषून घेण्याचा, फैलावण्याचा तसेच तिचे उत्सर्जन करण्याचा मोठा गुण आहे. पाणी हे विश्वव्यापी विद्रावक (पदार्थ विरघळविणारे द्रव्य) आहे व ते तीनही अवस्थांत मिळू शकते. पाहिजे तसे ऊष्मीय आणि यांत्रिक उपयोग करण्यासारखे ते एक लवचिक माध्यम आहे. ते जरूर त्या शरीरभागापुरतेच किंवा सबंध शरीरावर वापरता येते. त्याची उष्णता शोषणक्षमता एवढी मोठी आहे की, या गुणामुळेच ते विशिष्ट उष्णता मानक बनले आहे. त्यापासून उष्णता उत्सर्जनही सहज होते म्हणून ते शरीराची उष्णता कमी करण्याकरिता किंवा वाढविण्याकरिता वापरता येते. ते बस्तीकरता उत्तम द्रव्य आहे. जलपानामुळे यूरिक अम्ल, यूरिया लवणे, जादा साखर व इतर अनेक टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते. सूर्यस्नानात सबंध शरीर उघडे करून सूर्यप्रकाश अंगावर खेळू देतात. हवास्नानातही हवा विवस्त्रावस्थेतील शरीरावर घेण्याचा उद्देश असतो. हवा थंड असल्यास ती संपूर्ण तंत्रिका तंत्राचे (मज्जासंस्थेचे) बलवर्धन करते व त्वचेचे कार्य सुधारते. वरील स्नान प्रकारांशिवाय निसर्गोपचारतज्ञास कुने पद्धतीतील बाष्पस्नान, कटिस्नान, सिट्सबाथ (गुह्यांग स्नान) इत्यादींविषयी माहिती असावी लागते.
मातीचे उपचार :
पंचमहाभूतांतील पृथ्वी हे तत्त्व मातीच्या स्वरूपात असून त्याचा निसर्गोपचारातील उपयोग एक महत्त्वाचा भाग बनला आहे. जर्मन निसर्गोपचार तज्ञ ए. जस्ट यांनी मातीच्या उपचाराबद्दल बरीच माहिती सांगितली असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मातीचा उपयोग करून असाध्य रोगही बरे होतात. मातीविषयी खास लक्षात ठेवावयाची गोष्ट म्हणजे ती स्वच्छ जागेतील व उत्तम असली पाहिजे. मातीचे निरनिराळे प्रकार असून त्यांचे गुणधर्मही निरनिराळे आहेत. काळ्या मातीपेक्षा नदीतील तांबडी गाळाची माती अधिक गुणकारी आहे. अती चिकट माती वापरू नये. रेताड व कमी चिकट माती उत्तम असून ती चाळणीतून चाळून थंड पाण्यात भिजवून वापरतात. ती शरीरावर लेपासारखी लावता येते किंवा फडक्याच्या पुरचुंडीतून ठराविक जागी लावता येते. काही घरगुती उपचारांत माती उत्तम ठरली आहे, उदा., विंचूदंश झालेल्या जागी माती लावतात. महात्मा गांधींचे मातीच्या उपचारासंबंधी काही अनुभव पुढे दिले आहेत. (१) आमांश झाल्यावर ओटीपोटावर मातीचा जाड लेप दिल्याने आमांश दोनतीन दिवसांत कमी झाला. (२) डोकेदुखीवर मातीचा लेप डोक्यावर बांधताच बरे वाटले. (३) डोळ्यांची आग मातीची जाड वडी डोळ्यांवर ठेवल्यावर कमी झाली.
निसर्गोपचार पध्दती
योगोपचार पध्दती
अधिक माहीतीसाठी......